गालगुंड हा विषाणुजन्य आजार सहसा लहान मुलांमध्ये (पाच-सहा वर्षे) येतो. या वयात हा एक तसा निरुपद्रवी आजार असतो. हा आजार लहान वयात आला नाही तर मोठया वयात येण्याची शक्यता असते. असे झाले तर स्त्रीबीजांड- पुरुषबीजांडामध्ये हा आजार शिरून वंध्यत्व येण्याची दाट शक्यता असते हे त्याचे वैशिष्टय आहे. म्हणून गालगुंड टाळण्यासाठी लस दिली जाते. मुख्य लक्षणे हा आजार मुलांमध्ये श्वसनामार्फत पसरतो. थोडा ताप, लाळग्रंथी (गालातील) सुजणे,दुखणे ही त्यांपैकी मुख्य लक्षणे. पाच-सात दिवसांत हा आजार बरा होतो. प्रौढ व्यक्तींना मात्र या 'गालफुगी' बरोबर वृषण (पुरुष) किंवा ओटीपोटात (स्त्रिया) दुखल्यास बीजांडापर्यंत आजार पोचल्याची ही खूण असते. यामुळे कायमचे वंध्यत्व येण्याची शक्यता असते. तरुण-मोठया माणसांमधील गालफुगी म्हणूनच गंभीर असते. लहान मुलांना नुसते पॅमाल औषध पुरते. प्रतिबंधक उपाय गालगुंडांसाठी प्रतिबंधक लस आहे, पण ती महाग असल्याने अजून तरी सार्वत्रिक वापरात नाही. गालगुंडाची प्रतिकारशक्ती जन्मभर टिकते. लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine) संदर्भ : आरोग्यविद्या