प्रस्तावना

बहुतेक सर्वांनाच कधीतरी डोकेदुखी होत असते, आणि काही जणांना तर ती फारच त्रासदायक ठरते. पण बहुतेक ही थोड्या वेळासाठीच होते.

डोकेदुखी थोड्या वेळासाठीच होते आणि आपोआपच बरी होवून जाते. तथापि, फारच दुखत असेल तर तुमच्या डॉक्टरला दाखविण्यात हयगय करू नका. डोकेदुखी गंभीर, वारंवार होणारी किंवा तापाबरोबर होणारी आहे काय हे डॉक्टरने तपासले पाहिजे.

डोकेदुखी केव्हां गंभीर ठरते?

प्रत्येक डोकेदुखी करीता वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज पडतेच असे नाही. काही प्रकारची डोकेदुखी जेवण न घेतल्याने किंवा स्नायूंचा ताण यांच्यामुळेही होते आणि तिच्यावरचा औषधोपचार घरीच केला जाऊ शकतो. परंतु इतर प्रकारची डोकेदुखी इतर काही गंभीर बाबींशी संबंधित असू शकते आणि त्यामध्ये वैद्यकीय मदतीची गरज भासते. जर तुम्हांला डोकेदुखीमध्ये खालील लक्षणे आढळली तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरला दाखवायला हवे:

‘माझ्या आयुष्यातील सर्वांत वाईट डोकेदुखी’ असे वर्णन करता येईल अशी गंभीर, अचानक उद्भवणारी डोकेदुखी

अशी डोकेदुखी ज्यावेळी शुध्द हरपते, गोंधळायला होते, दृष्टीत फरक पडतो किंवा इतर शारीरिक अशक्तपणा येतो

मान आखडणे आणि तापाबरोबर येणारी डोकेदुखी

डोकेदुखीच्या दरम्यान तुम्हांला खालील लक्षणे आढळली तर तुम्ही वैद्यकीय मदत घ्यावी

तुम्हांला झोपेतून जागे करणारी डोकेदुखी.

डोकेदुखीच्या प्रकारात आणि वारंवारतेमध्ये घडणार्या बदलांचे काहीही स्पष्टीकरण न देता येणे

जर तुम्हांला तुमच्या डोकेदुखीचा प्रकार माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरला दाखविणे जास्त योग्य ठरेल.

ताण (टेंशन) मायग्रेन (अर्धशिशी) आणि क्लस्टर हे डोकेदुखीचे प्रकार आहेत. मायग्रेन व क्लस्टर हे व्हास्क्युलर डोकेदुखीचे प्रकार आहेत. व्हास्क्युलर डोकेदुखी असतांना शारीरिक श्रम जास्त त्रासाचे ठरतात. डोक्याच्या पेशींमधील रक्तवाहिन्या सुजतात किंवा पसरतात ज्यामुळे तुमच्या डोक्याला ठणके लागून ते दुखते. व्हास्क्युलर डोकेदुखीचा सर्वसामान्य प्रकार असलेली, क्लस्टर डोकेदुखी ही मायग्रेनपेक्षा जास्त प्रमाणात आढळते.

क्लस्टर डोकेदुखी सामान्यत: पुन्हा-पुन्हा होत राहते – कधी आठवडाभर तर कधी काही महिनेदेखील टिकू शकते. पुरुषांमध्ये ही क्लस्टर डोकेदुखी मोठया प्रमाणात दिसून येते आणि ती अत्यंत वेदनापूर्ण असते.

निदान

साधारणपणे डोकेदुखी गंभीर प्रकारची नसते आणि सर्वसाधारण औषधांनी बरी होते. मायग्रेन किंवा इतर प्रकारच्या गंभीर डोकेदुखीमध्ये वैद्यकीय मदत आणि निरीक्षणाची गरज पडते.

मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी

मानसिक ताणामुळे किंवा स्नायूंच्या आकुंचनामुळे होणारी डोकेदुखी ही सर्वत्र आढळणारी सामान्य प्रकारची डोकेदुखी असते, आणि ताणाच्या काळाबरोबर ती देखील वाढत जाते.

मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी बहुतेक स्थिर व कमी त्रासदायक असते आणि कपाळ, कानशिले आणि मानेच्या मागील बाजूला जाणवते.

मानसिक ताणामुळे होणार्या डोकेदुखीचे वर्णन करतांना लोक असे म्हणतात की त्यांच्या डोक्याभोवती एखादा पट्टा फार करकचून बांधल्यासारखे वाटत आहे.

मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी जास्त वेळ टिकून राहत असली तरी ताणाचा काळ संपला की ती थांबते.

मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखी इतर कुठल्याही लक्षणांशी निगडित नसते आणि मायग्रेन डोकेदुखीमध्ये कोणत्याही प्रकारची पूर्व-लक्षणे दिसून येत नाहीत. सर्व प्रकारच्या डोकेदुखींमागचे कारण 90 टक्के वेळा मानसिक ताणामुळे होणारी डोकेदुखीच असू शकते.

सायनस डोकेदुखी

सायनस डोकेदुखी ही सायनस संसर्ग किंवा ऍलर्जीमुळे होते. सर्दी किंवा फ्लू नंतर होणारी ही डोकेदुखी, तुमच्या नाकाच्या वर आणि मागे असलेल्या हाडांच्या पोकळीतल्या सायनस मार्गात सूज आल्याने होते. सायनस तुंबल्यास किंवा त्यांना संसर्ग झाल्यास तो ताण तुमच्या डोक्यावर पडतो आणि तुम्हांला डोकेदुखी होते. हे दुखणे फार गंभीर व निरंतर असते, सकाळी सुरू होते आणि तुम्ही वाकलांत तर आणखीनच जास्त होते.

सायनस डोकेदुखीची सामान्य लक्षणे

डोळे, गाल आणि कपाळावर दबाव पडतो आणि खूप दुखते

वरच्या दातांमध्ये दुखल्यासारखे वाटणे

ताप व थंडी वाजून येणे

चेहर्यावर सूज येणे

शेक आणि बर्फ या दोन्हींचा उपयोग सायनस डोकेदुखीमधील चेहर्याची सूज घालविण्यासाठी करण्यात येतो.

मायग्रेन डोकेदुखी

मायग्रेन डोकेदुखीचा प्रकार प्रत्येकासाठी वेगवेगळा असू शकतो, पण सामान्यत: ह्याच्या लक्षणांमध्ये डोक्याच्या दोन्ही किंवा एका बाजूला खूपच दुखणे आणि इतर लक्षणांचा ही समावेश असतो. ह्यामध्ये मळमळ किंवा उलटी होणे, प्रकाश सहन न होणे, दृष्टीत गोंधळ, चक्कर येणे, ताप व थंडी वाजणे ही लक्षणे आढळतात.

मायग्रेन डोकेदुखीची सर्वसामान्य लक्षणे

डोकेदुखीबरोबर दृष्टीतील गोंधळ

डोक्याच्या एका बाजूला फारच कमी किंवा खूपच जास्त थाड-थाड मारल्यासारखे डोके दुखणे

मळमळ किंवा वांती होणे

प्रकाश व आवाज सहन न होणे

मायग्रेन सुरू होण्याची पुष्कळ कारणे असू शकतात, जी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळी असू शकतात. काही लोकांना विशिष्ट प्रकारच्या आहाराचे वावडे असते - उदाहरणार्थ वाइन, चॉकलेट, जुने चीज, प्रक्रिया केलेल मांस आणि कॅफीनचा उल्लेख सर्वसामान्यपणे केला जातो. कॅफीन व अल्कोहोलमुळे देखील मायग्रेन उद्भवते.

टीप : जर तुम्हांला पुष्कळ प्रकारच्या गंभीर डोकेदुखी होत असतील तर त्याची लक्षणे, डोकेदुखीची तीव्रता आणि तुम्ही दुखणे कसे सहन केले या वर लक्ष ठेवा. ही माहिती तुमच्या डॉक्टरला द्या.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम