उन्हातून आल्यावर काही लहान मुलांमध्ये नाकातून रक्तस्राव होतो. याला घोळणा फुटणे असे म्हणतात. यात नाकाच्या पुढच्या भागातल्या नाजूक रक्तवाहिन्या (केशवाहिन्यांचे जाळे) उष्णतेने फुगून फुटतात व रक्त येते. काही वेळा अतिरक्तदाब किंवा रक्ताच्या कर्करोगात पण घोळणा फुटतो. म्हणून वारंवार असा त्रास होत असल्यास तज्ज्ञास दाखवावे. प्रथमोपचार रक्तस्त्राव सुरु असताना जास्त हालचाल न करता बसून रहावे. डोके पुढे झुकलेले ठेवावे. म्हणजे रक्त गिळले जाणार नाही. ऍड्रेनॅलिन स्प्रे उपलब्ध असल्यास नाकात एकदा फवारा मारावा. याने रक्तवाहिन्या आकसून रक्तस्राव थांबतो. वाटल्यास 5 मिनिटांनी परत एकदा मारावा. मात्र अतिरक्तदाबाच्या रुग्णांना हा उपचार करु नये. नाकाचा पुढचा भाग हाताच्या बोटाने 2-5 मिनिटे दाबून धरावा. याने रक्तवाहिन्यांतून रक्त येणे बंद होते. नाकाला व गालांना थंडगार पाणी किंवा बर्फ लावल्याने रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तस्राव थांबायला मदत होते. रक्तस्राव थांबल्यावर उशी घेऊन उताणे निजून राहावे. आयुर्वेद वारंवार घोळणा फुटण्यामागे योग्य ती सर्व तपासणी (तज्ज्ञाकडून) होऊन गंभीर कारण नसल्यास पुढील उपचार करा. पोटातून दीड-दोन चमचे अडुळसा रस व मध आणि गूळ (किंवा साखर) द्यावे. रक्तस्रावाच्या प्रवृत्तीला या उपायाने आळा बसतो. लेखक: डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine) संदर्भ: आरोग्यविद्या