जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार भारतात 1 ते 14 वर्षे वयोगटातील जवळपास 68 टक्के बालकांमध्ये आढळणारा आतड्यांचा कृमी दोष हा मातीतून प्रसारीत होणाऱ्या जंतांमुळे होतो. भारतात 28 टक्के बालकांना कृमीदोष होण्याची शक्यता असते. याची प्रमुख कारणे म्हणजे वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचा अभाव असणे हे आहे. या कृमी दोषांचा संसर्ग दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे सहजतेने होतो. बालकांमध्ये होणारा दीर्घकालीन कृमीदोष हा व्यापक स्वरुपाचा असून मुलांना कमजोर करणारा आहे. कृमी दोष हा रक्ताक्षय आणि कुपोषणाचे कारण, तर आहेच तसेच बालकांची बौध्दिक व शारीरिक वाढ खुंटण्याचे कारण ठरते. भारतात 6 ते 59 महिन्यांच्या वयोगटात प्रत्येकी 10 बालकांमागे 7 बालकांमध्ये रक्ताक्षय आढळतो व ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण जास्तही असू शकते. तसेच 15 ते 19 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलींमध्ये व 30 टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्ताक्षय आढळतो. भारतामध्ये 5 वर्षांखालील जवळजवळ 50 टक्के बालके वाढ खुंटलेली आहेत आणि साधारणत: 43 टक्के बालके कमी वजनाची आहेत. 10 फेब्रुवारी ह्या राष्ट्रीय जंतनाशक दिनी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे पोषणस्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा उद्देश आहे. जंतनाशक मोहिमेची अंमलबजावणी 10 फेब्रुवारी व 15 फेब्रुवारी 2017 रोजी करण्यात येणार आहे. या दिनाबाबतची माहिती सांगणारा लेख... बालकांचे आरोग्य, त्यांची पोषणविषयक स्थिती, शिक्षणाची संधी व जीवनाचा दर्जा सुधारावा यासाठी 1 ते 19 वर्षे या वयोगटातील अंगणवाडी केंद्रातील (दाखल झालेल्या व दाखल न झालेल्या) सर्व शासकीय अनुदानित शाळा व शासकीय शाळा तसेच या वयोगटातील शाळेत न जाणारे बालकांमध्ये (मुले-मुली) जंतनाशकाचा उपक्रम राबविणे पहिली ते बारावीतील सर्व शाळेत जाणारे मुले-मुली, 6 ते 19 वर्षे वयोगटातील शाळेत न जाणारी मुले-मुली, 1 ते 6 वर्ष वयोगटातील ज्या बालकांना नोव्हेंबर 2016 च्या जीवनसत्व अ व जंतनाशक मोहिमेमध्ये जंतनाशक औषधी दिली नसतील, फक्त अशी बालके असे राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, नागरी विकास, महिला व बालविकास विभाग, पंचायत राज मंत्रालय, जंतनाशक करण्याचा जागतिक उपक्रम व पार्टनर्स हे सहभागी आहेत. जंतांचे प्रकार व प्रसाराचे चक्र राऊंड वर्म, व्हीप वर्म, दृक वर्म असे तीन प्रकार आहेत. जंतांचा प्रादुर्भाव हा अस्वछता व मलिनता यांचा परिणाम आहे. दूषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे जंतांचा प्रसार होतो. शौचामध्ये जंतांची अंडी आहेत अशी संसर्ग झालेली व्यक्ती उघड्यावर शौचाला बसते. या अंड्यांची मातीत वाढ होते, ही अंडी अन्नातून वा अस्वच्छ हातांमुळे अथवा जंतांच्या अळ्या त्वचेतून शरीरात गेल्याने अन्य व्यक्तींना संसर्ग होतो. संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरात अंडी वा अळ्यांची वाढ होऊन जंत तयार होतात. जे नंतर परत अंडी घालतात याप्रमाणे जंतांच्या प्रसाराचे चक्र सुरू असते. लक्षणे मोठ्या प्रमाणात जंतसंसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये तीव्र स्वरुपातील लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. तीव्र संसर्गामुळे अतिसार, पोटदुखी, अशक्तपणा व मंदावलेली भूक यासारखी विविध प्रकारची लक्षणे दिसून येतात. सौम्य प्रमाणात संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये साधारणपणे कोणतीच लक्षण दिसत नाहीत. आरोग्य व पोषणस्थितीवर जंतांचा परिणाम जंतांचे पोषण, ते जिथे आहेत ते तेथील उतीवर होते. यात रक्ताचा समावेश असल्याने रक्तक्षय होतो. आरोग्याची हानी होऊन त्याचा विकास व शारीरिक वाढ यावर मोठा दुष्परिणाम होतो. जंतांचे पोषण मानवी शरीरासाठी असलेल्या पोषकद्रव्यांवर होत असल्याने रक्ताची हानी व कुपोषण होते तसेच वाढ खुंटते. राऊंड वर्म जंत आतड्यातील अ जीवनसत्वावर परिणाम करतात. तीव्र प्रमाणात संसर्ग झाल्यास बालक सतत आजारी पडते वा त्याला थकवा जाणवतो. बालकाचा शारीरिक व बौध्दिक विकास खुंटतो, ज्याचा दुष्परिणाम मोठेपणी त्याच्या दीर्घकालीन कार्यक्षमतेवर व अर्थार्जनावर होऊ शकतो. जंतसंसर्ग कसा थोपवावा हात स्वच्छ धुवावेत, विशेषत: जेवणापूर्वी व शौचालयाचा वापर केल्यावर. पायात चपला, बूट घालावेत, निर्जंतूक व स्वच्छ पाणी प्यावे. व्यवस्थित शिजवलेले अन्न खावे, निर्जंतूक व स्वच्छ पाण्यात भाज्या व फळे धुवावीत. नखे नियमित कापावीत व स्वच्छ ठेवावीत. जंतसंसर्गावर उपचार जंतनाशक गोळी- एल्बेंडेझॉल 400 मि.ग्रॅ. (विनामूल्य उपलब्ध ) 1 ते 2 वर्षाच्या बालकास अर्धी गोळी (200 मि.ग्रॅ., पावडर करुन द्यावी), 2 ते 19 वर्ष पूर्ण गोळी (400 मि.ग्रॅ.) जंतनाशकाचे फायदे रक्ताक्षय कमी होतो व आरोग्य सुधारते. बालकांची वाढ भराभर होते व ती निरोगी बनतात. अन्य संसर्गांचा प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. शाळेतील उपस्थिती वाढण्यास मदत होते. बालकाची आकलनशक्ती सुधारते व ते शाळेत अधिक क्रियाशील बनतात. मोठेपणी काम करण्याची व दीर्घकाळात अर्थार्जन करण्याची क्षमता वाढते, महत्वाचे अप्रत्यक्ष फायदे- समाजातील व्यक्तींना जंतनाशकाच्या उपचाराची आवश्यकता भासत नाही कारण परिसरातील जंतांची संख्या कमी होते. शाळा व अंगणवाडी स्तरावरील जंतनाशकाच्या उपक्रमाचे फायदे या संस्थांमुळे बालकांना मोठ्या संख्येने तसेच सुरक्षित मार्गाने जंतनाशक गोळी वितरित करण्याची संधी व व्यासपीठ मिळते. या उपक्रमाचा एका दिवसात अधिक प्रसार होतो कारण लक्षीत बालके मोठ्या संख्येने शाळांमध्ये उपलब्ध असतात. शिक्षक व अंगणवाडी कार्यकर्ती जंतनाशकाची गोळी देण्यासाठी हे दोन अत्यंत मौल्यवान स्त्रोत आहेत. यांच्यामार्फत जंतसंसर्गाला अटकाव व त्यावरील उपचार याबाबतची माहिती प्रभावीपणे देऊ शकतात. कारण त्यांना समाजामध्ये तसेच पालक व बालक यांच्या मनामध्ये मानाचे स्थान आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिवस (एनडीडी) व मॉप-अप दिवस (एमयूडी) 10 फेब्रुवारी 2017 हा दिवस जंतनाशक दिन आहे. यादिवशी 1 ते 19 वर्षे वयोगटातील बालकांसाठी शासकीय/शासकीय अनुदानीत सर्व शाळांमध्ये व राज्यातील अंगणवाडी केंद्रात शिक्षक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना (6 ते 19 वर्ष) एल्बेंडेझोलची गोळी देतील. अंगणवाडी सेविका 1 ते 6 वर्षे वयोगटातील व शाळा सोडून दिलेल्या बालकांचा तसेच किशोरवयीन मुलांना व मुलींना अंगणवाडी केंद्रात एल्बेंडेझोल देतील. पण नोव्हेंबर 2016 च्या जीवनसत्व अ व जंतनाशक मोहिमेमध्ये औषधी दिली नसतील फक्त अशी बालके. आशा कार्यकर्तीच्या मदतीने जंतनाशक उपक्रमासाठी अंगणवाडी केंद्रात दाखल न झालेल्या बालकांना सुध्दा नजीकच्या अंगणवाडी केंद्रात जमवावे. एनडीडी/एमयूडी दिवशी आजारी वा अन्य औषधे घेणाऱ्या बालकांना एल्बेंडेझोलची गोळी दिली जाणार नाही. अशा बालकांना ही गोळी आजारातून बरे झाल्यावरच देण्यात यावी. गैरहजेरी वा आजारपण यामुळे ज्या बालकांना जंतनाशकदिनी हे औषध दिले गेले नसेल त्यांना 15 फेब्रुवारी 2017 या मॉप-अप दिनी ते दिले गेलेच पाहिजे. अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती, मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सामाजिक जागरुकता केली पाहिजे. तालुकास्तरावर या मोहिमेंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी यांनी नोडल शिक्षक, आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, सर्व आरोग्य कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 10 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 467482 बालकांना व शहरी भागातील 127078 बालकांना शासकीय शाळा, शासकीय अनुदानित शाळा, अंगणवाणी केंद्र, आश्रमशाळा येथे जंतनाशक गोळीचा डोस देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा पातळीवर 630000 जंतनाशकांच्या गोळ्या प्राप्त झालेल्या आहेत. या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबर शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभागाचा सहभाग आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत प्रत्येक अंगणवाडी, शाळेपर्यंत औषध, प्रसिद्धी साहित्य, बॅनर, पोस्टर व माईकिंगद्वारे प्रचार करण्यात येणार आहे. लक्षात ठेवा जंतनाशकासाठी एनडीडी दिनी सर्व पालकांना बालके शाळेत घेऊन येण्यासाठी प्रोत्साहन देणे, शालेय व्यवस्थापन समित्या, पालक- शिक्षक बैठका या दरम्यान या संदेशाचा प्रचार करणे, आजारी बालकांना औषध न देणे, ज्या बालकांना जंतनाशक दिनी हे औषध दिले गेले नसेल त्यांना 15 फेब्रुवारी 2017 या मॉप-अप दिनी ते देणे अत्यावश्यक आहे. मुख्याध्यापक, नोडल शिक्षक व आरोग्यसेविका यांच्याकडे वेळेत पोचतील हे सुनिश्चित केले पाहिजे. शाळा व अंगणवाडी केंद्राने आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य अधिकारी, ब्लॉक प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्यसेविका व आरोग्यसेवक, आपत्कालीन मदत सेवा यांच्या संपर्काचे तपशील उपलब्ध असून ते भिंतीवर चिकटवलेले असतील हे सुनिश्चित केले पाहिजे. गोळीचे दुष्परिणाम दिसून आल्यास मदतीसाठी संबंधितांशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा. संकलन- संजय बोराळकर,जिल्हा माहिती कार्यालय, धुळे. स्त्रोत - महान्युज