प्रस्तावना आपल्या भागातील एखाद्या मोठया गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असते. आपल्या तालुक्यात 5-10 प्राथमिक आरोग्य केंद्रे असू शकतील. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात 5-6 उपकेंद्रे असतात आणि 25,000-30,000 इतकी लोकसंख्या असते. प्रत्येक गाव कोणत्यातरी केंद्राच्या क्षेत्रात समाविष्ट असतेच. तुम्ही कधी प्राथमिक आरोग्य केंद्रावर गेला आहात काय? प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर्स, नर्सेस, कंपाउंडर तसेच इतर सेवक वर्ग असतो. 4-6 उपकेंद्रांच्या मदतीने रोगांचा प्रतिबंध, आरोग्याचा प्रसार आणि आजारांवरचे उपचार करणे हे प्राथमिक आरोग्यकेंद्राचे मुख्य कार्य आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राची मुख्य कामे स्त्रिया आणि मुलांच्या आरोग्याकरता आखलेले राष्ट्रीय कार्यक्रम राबवणे. हिवताप, हत्तीरोग, टी.बी. कुष्ठरोग, अंधत्व, लैंगिक रोग आणि एड्स वगैरे आजारांचे नियंत्रण. सहा रोगांवर लसीकरण करणे. गरोदरपण, बाळंतपण आणि बाळंतपणानंतर लागणारी आरोग्य सेवा पुरवणे. हल्ली भारत सरकारने सर्व बाळंतपणे घरी न होता रुग्णालयात व्हावे या दृष्टीने प्रयत्न सुरु केलेले आहेत. शाळेतल्या मुलांची वैद्यकीय तपासणी आणि उपचार करणे. हगवणीसारख्या सांसर्गिक आजारांचा प्रतिबंध व उपचार. निरनिराळया आजारांवर उपचार करणे. संततिनियमनाच्या सेवा, शस्त्रक्रिया तसेच सुरक्षित गर्भपात करणे. आजार रोखण्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आरोग्य प्रशिक्षण देणे. रोगांचे निदान,उपचार आणि रोगांच्या प्रतिबंधासाठी मोहीम राबवणे. जत्रांमध्ये आणि आठवडे बाजारांच्या ठिकाणी आरोग्य सेवा पुरवणे. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर ओपीडीत रुग्णांवर उपचार करतात. काही रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखलही केले जाते. उपकेंद्रातील आरोग्यसेवकांच्या सल्ल्याने रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल होतात. कधीकधी प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्णांना ग्रामीण रुग्णालय किंवा जिल्हा रुग्णालयात नेले जाते. प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर त्यांच्या अखत्यारीतील उपकेंद्रांना व अंगणवाडयांना भेट देतात. नर्सताईच्या कामावर लक्ष ठेवणे, गावक-यांना भेटणे आणि वैद्यकीय सेवा पुरवणे हीदेखील त्यांची कामे आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांवर इतरही जबाबदा-या असतात. रोगांवर उपचार करणे हा एक भाग झाला. बैठकांना उपस्थित राहणे, शवविच्छेदन करणे व वैद्यक-कायद्याशी संबंधित कामे करणे या त्यांच्या इतर जबाबदा-या आहेत. लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine) संदर्भ : आरोग्याविद्या