सामाजिक आरोग्यमान निरनिराळया देशांत समाजाच्या आरोग्यमानात काय फरक पडतो हे आपण पाहिले. भारत इतर देशांच्या तुलनेत कोठे आहे ते यावरून दिसेल. निरनिराळया आरोग्यदर्शक कसोटया लावल्यानंतर एक-दोन देश सोडले तर भारताचा क्रम अगदी शेवटीशेवटी लागतो. भारतामध्येही प्रांताप्रांतात तुलना केली तर खूप वेगवेगळे चित्र दिसते. केरळ, पंजाब, हरियाणा या प्रांतातले आरोग्यमान महाराष्ट्र, तामीळनाडू, आंध्रप्रदेश, बिहार इत्यादींपेक्षा बरे दिसते. महाराष्ट्रातही खेडयांमधील आरोग्यमान शहरांपेक्षा निकृष्ट दिसते. मुंबई व मोठी शहरे काढल्यास महाराष्ट्राचे आरोग्य मागास दिसते. हा फरक नेमका कशामुळे पडतो ते आता पाहू या. समाजाच्या आरोग्यमानात फरक होण्याची मुख्य कारणे राहणीमान-उत्पन्न, आहार, स्वच्छ पाण्याची उपलब्धता, निवारा, शिक्षण, आरोग्याशी संबंधित चालीरीती, उपभोगाची साधने, स्वच्छतेच्या सोयी इत्यादी. आरोग्यसेवा, (खाजगी आणि सरकारी) कामधंद्याचे स्वरुप. आरोग्यशिक्षण - आरोग्यमाहिती या घटकांशिवाय वांशिक वारसा, भौगोलिक व नैसर्गिक परिस्थिती हे घटकही महत्त्वाचे आहेत. राहणीमानासाठी सध्या मानवविकास निर्देशांक वापरला जातो. याबद्दल आता आपण पाहू या. स्त्रोत : आरोग्यविद्या