तुमचा वेळ त्रासात जात आहे ? तर मग येथे मन शांत करण्याची 15 मिनिटाची पद्धत आहे. बघा प्रयत्न करुन, जमतंय का !

काही वेळा सगळ्या गोष्टी हाताबाहेर जात असतात. कामाचा भार वाढत राहतो आणि काय करावे हे सुचत नाही. सततची येणारी कामे, अडचणी आणि लोक यांनी तुम्ही त्रासून जाता. शरीर काम करीत असतं पण मनात एक वेगळे वादळ उठत असतं. काहीच नीट नाही, ही भावना सर्व शक्ती शीण करीत असते.

दिवस अखेरीस आपल्याला जड आणि तणावपूर्ण वाटते. त्याहून वाईट म्हणजे, आपण काही तरी महत्वाचे विसरत नाही ना असे वारंवार वाटत राहते. विचारांना आवर घालता येत नाही. याचाच परिणाम म्हणून आपण घरी आल्यावर जोडीदारावर, मुलांवर किंवा इतर लोकांवर चिडचिड करतो. आपला संपूर्ण राग घरच्यांवर निघतो, जे योग्य नाही. पुढील साधे आणि सोपे उपाय 15 मिनिटात तुम्हाला प्रफुल्लित करु शकतात.

पाच मिनिटांची शारीरिक हालचाल

आधीच कार्यालयात कामे करताना आपण खूप वैतागले असाल तर इमारतीच्याभोवती जलद चालणे फायदेशीर ठरेल. हा एक ब्रेक आपल्या मनात ऊर्जा निर्माण करेल आणि मन शांत करुन ताण खंडित होईल. लक्ष वेगळीकडे वळवल्याने मन शांत होईल आणि तुम्हाला हलके वाटेल. शरीराला आणि मनाला बदल मिळेल.

चार मिनिटांची कृतज्ञता

आता आपल्या शरीरात चैतन्य परत आले आहे. आपण आपले विचार साफ करण्याची सुरुवात करु शकता. आपण हे सर्व का करीत आहोत हे लक्षात घ्या. आपले जीवन मूल्यवान आहे आणि आपल्याला किती लोकांची साथ लाभली आहे याचा विचार करा. त्या सर्व लोकांचे आपण आभारी आहोत ही जाणीव कायम लक्षात ठेवा. चांगले आरोग्य, चांगली संधी आणि सुंदर वास्तव्य याच्याबद्दल कृतज्ञ राहा. आपण एक व्यापक दृष्टिकोन बाळगा. निवडक गोष्टींची टीप लिहून ठेवा. सध्या दुसऱ्या कामाची गरज नाही, महत्वाचे काम संपवा.

तीन मिनिटांचे ध्यान

आता आपले शरीर आणि मन एका सकारात्मक स्थितीत आहे. साफ मनाने आपले काम करु शकता. ध्यान, एक विचार स्वच्छ आणि आपले केंद्र शोधण्याचे उत्तम साधन आहे. तुम्ही भरपूर गोष्टी ध्यान करण्यासाठी वापरु शकता. कोणी प्रार्थना म्हणत तर कोणी पाय हलवत एखाद गाणं गुणगुणत. तुम्ही इंटरनेटवर छानसं चित्र किंवा बातम्या वाचू शकता. ह्या सर्व गोष्टींचे तात्पर्य हे कि आपले मन शांत आणि सुखद झाले पाहिजे.

दोन मिनिटाची शांतता

आता आपल्या मनात स्पष्ट करुन टाका कि शांतता हवी आहे. तुम्ही बस एक शांत जागा शोधा आणि तिथे थोडा वेळ शांत बसा. आपले फोन, दिवे, संगणक आणि सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तु दोन मिनिटे बंद ठेवा. सर्व प्रेरणा बाहेर अवरोधित करा. स्वत:बरोबर एकटे राहा आणि आपले लक्ष शांततेकडे केंद्रित करा. फोनमध्ये दोन मिनिटाचा टायमर सेट करा आणि शांत बसा. आता तुम्ही थंड आणि शांत आहात हे स्पष्ट होईल.

एक मिनिटाचा खोल श्वास

आता शांतपणे शेवटी एक मिनिट उभे रहा. अर्थात, तुम्हाला माहीत आहे कि परत कामाला लागायचे आहे म्हणून एक मिनिट दीर्घ श्वास घ्या. आपले पूर्ण लक्ष मंद श्वासाकडे केंद्रित करा. एका मिनिटाचा श्वास, व्यायाम तुम्हाला ताजं आणि उत्साही बनवेल. आता जागेवर जाऊन परत काम सुरु करायचे आहे. हे काम त्रास करुन न घेता करायचे आहे असा चंग बांधा आणि नवीन जोमाने कामाला लागा.

हे सर्व उपाय तुमचे शरीर आणि मन शांत करण्यास मदत करतील. बघा, तर मग करुन !

लेखिका - सुजाता चंद्रकांत.

स्त्रोत : महान्युज